4kNews कामोठे
उरण, दि. 27 (विठ्ठल ममताबादे) : “पोस्टाचे कामगार काळानुरूप बदल स्वीकारत आहेत. येणाऱ्या काळात आव्हाने असणार आहेत. त्यामुळे स्वतःला सतत अपडेट ठेवण्याबरोबरच माणुसकी हा धर्म समजून काम करणे गरजेचे आहे. मी समाजासाठी काम करताना जात-धर्म पाहत नाही. माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे माझ्या हृदयात कोरलेले आहे,” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले.

पनवेल येथे रविवारी (दि. २६) पोस्टल युनियनच्या दहाव्या द्विवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी पोस्टल युनियनच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

महेंद्रशेठ घरत यांनी रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. तसेच शैक्षणिक संस्था व क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अधिवेशनाला पोस्टाचे कर्मचारी व युनियनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

