4kNews कामोठे 12
पनवेल (प्रतिनिधी) : शेतकरी कामगार पक्ष आणि एकता एज्युकेशनल अँड वेलफेअर असोसिएशन, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पटेल मोहल्ला येथील आरिफ पटेल जनसंपर्क कार्यालयात मोफत आयुष्मान भारत कार्ड व आभा (ABHA) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (दि. १०) झालेल्या या शिबिरात सुमारे २५० नागरिकांनी नोंदणी करून लाभ घेतला.

माजी उपनगराध्यक्ष आरिफ पटेल, यासीन आरिफ पटेल, शेकाप कार्यकर्ते मझहर पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून हे शिबिर घेण्यात आले. नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला महिला, ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, पालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, गटनेते केतन भगत, नगरसेवक लतीफ शेख, नगरसेविका मनीषा म्हात्रे, आर्या जाधव, शिवसेना (उबाठा)चे प्रवीण जाधव, अनंत म्हात्रे, दत्तात्रेय कडू, सागर पाटील यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.

