4kNews कामोठे दि.14
राष्ट्रीय, दि. १२ ऑक्टोबर : झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव (आयपीओ) गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी खुला होणार आहे. या आयपीओसाठी प्रति समभाग १४३ ते १५१ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया १४ ऑक्टोबरला होणार असून, सर्वसामान्य गुंतवणूकदारांना १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल.

या आयपीओमध्ये प्रत्येकी एक रुपये दर्शनी मूल्याचे समभाग उपलब्ध असतील. किमान ९९ समभागांसाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर ९९ समभागांच्या पटीत बोली लावता येईल.
या प्रस्तावात २,८३० कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी केले जाणार असून, विद्यमान भागधारकांकडून १४,४५२,५०३६ समभागांपर्यंत विक्रीचा प्रस्तावही समाविष्ट आहे. नवीन समभागांची विक्री आणि विद्यमान समभागांची विक्री मिळून हा आयपीओ सादर केला जाणार आहे.

आयपीओमधील समभागांचे वाटप पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार, बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सेबीच्या नियमांनुसार केले जाईल. अँकर गुंतवणूकदार वगळता अन्य गुंतवणूकदारांना एएसबीए प्रक्रियेद्वारे अर्ज करावा लागेल.

कंपनीचे समभाग बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या आयपीओसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल, मॉर्गन स्टॅनले, गोल्डमन सॅक्स, अव्हेंडस कॅपिटल, जेएम फायनान्शियल, एचएसबीसी सिक्युरिटीज आणि पॅन्टोमॅथ कॅपिटल हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
गुंतवणूकदारांसाठी सूचना : समभागांमधील गुंतवणुकीत बाजारातील चढ-उतारांसह आर्थिक जोखीम असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी) वाचून सर्व तपशील आणि जोखीम घटक तपासावेत.

