4kNews कामोठे दि. 10
पनवेल (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सक्षमीकरण संस्था, क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई, खारघर (NIEPID RC NM) ने जिल्हास्तरीय नृत्य व संगीत स्पर्धेत दोन्ही विभागांत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

इनरव्हिल क्लब खारघरच्या वतीने आयोजित या स्पर्धेत नवी मुंबई परिसरातील आठ विशेष शाळांनी सहभाग घेतला. NIEPID RC NM च्या नृत्य व संगीत स्पर्धेत एकूण ३२ विशेष विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दोन्ही विभागांत संस्थेने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली.
नृत्य स्पर्धेसाठी विशेष शिक्षिका स्मिता निळकंठ यांनी विद्यार्थ्यांना महिनाभर प्रशिक्षण, सराव व मार्गदर्शन केले. तर संगीत शिक्षिका मीना दासमोहपात्रा यांनी विद्यार्थ्यांची संगीताची तयारी करून घेतली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले.

या यशाबद्दल NIEPID RC NM नवी मुंबईचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि प्रोत्साहन मिळाल्यास विशेष विद्यार्थीही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे या यशातून सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेतील यशाचे श्रेय विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि NIEPID RC NMच्या संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांना देण्यात आले.

