4k समाचार दि. 1
पनवेल प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता पत्रकारांची एकजूट मोठा बळ देत आहे. पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या शिष्टमंडळाने दिल्ली गाठत केंद्रीय नागरी विमानन व हवाई उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना अधिकृत निवेदन सादर केले.

यावेळी नायडू यांच्या कार्यालयाने सकारात्मक भूमिका घेत विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, पत्रकारांच्या या भूमिकेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही दुजोरा दिला आहे. त्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या संघटित प्रयत्नांचे कौतुक करून त्यांचा लढा न्याय्य असल्याचे स्पष्ट केले.

सुरुवातीपासूनच पत्रकारांचा दबाव
विमानतळाच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांच्या भावना जपल्या जाव्यात, या भूमिकेतून पत्रकारांनी सिडको प्रशासनाला निवेदन देऊन धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. सिडकोकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊनही पत्रकारांनी दि. बां.च्या नावाची मागणी ठामपणे मांडली होती.

दिल्लीमध्ये व्यापक पाठपुरावा
दिल्ली भेटीदरम्यान पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या शिष्टमंडळाने केवळ केंद्र सरकारकडेच नव्हे, तर विरोधी पक्षातील काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही निवेदन दिले. या सर्व भेटींमुळे ‘विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे’ ही मागणी आणखी तीव्र झाली आहे.

पत्रकारांचा एकजूट लढा
या शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, विवेक पाटील, संजय कदम, निलेश सोनावणे, केवल महाडिक, राज भंडारी, प्रकाश म्हात्रे, विशाल रावसाहेब सावंत, गणपत वारगडा, शंकर वायदंडे यांसह अनेक पत्रकार सहभागी झाले होते.
स्थानिकांच्या भावनांचा आदर राखत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, यासाठी सुरू असलेला पत्रकारांचा संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.
