4k समाचार दि. 1
पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव कायम व्हावे यासाठी दिबा पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली गेली. मात्र याचवेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला झुगारून देण्याचा प्रयत्न काही बाहेरील मंडळी करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरुवातीपासूनच दिबांच्या नावासाठी आग्रही असलेल्या भूमिपुत्र पत्रकारांनी आता एकत्र येत विमानतळाला दिबांचेच नाव लागले पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेत स्थानिक पत्रकारांची मागणी देखील केंद्र सरकारने लक्षात घेतली पाहिजे, यासाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे पदाधिकारी हे दिल्ली येथे जाऊन त्यांनी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री किंजरापू नायडू यांना निवेदन दिले. त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या अर्थात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांना देखील निवेदन दिले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिबांच्या नावासाठी केलेला संघर्ष समोर आणताना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पनवेलमधील पत्रकारांच्या एकत्रीकरणाचा मुद्दा मांडला, त्या मुद्द्यामुळे पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विशेष आभार मानले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संघटना स्थापन करण्यात आली. त्यानंतर त्या संघटनेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी नेतृत्व स्विकारले. या दरम्यान अनेक आंदोलने, अनेक बैठका पार पडल्या. अनेक पक्षांच्या माध्यमातून आवाज देखील उठविण्यात आला. मधल्या काळात सरकार देखील बदलले आणि बदलून डबल सत्तेवर आले. यावेळी लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे म्हणून, पत्रकारही आपले अस्तित्व सांभाळून प्रसिद्धी देण्याचे काम करीत राहिले. मात्र स्थानिक प्रश्न हाताळणाऱ्या संघटनांना मदत करणाऱ्या पत्रकारांना देखील आता रस्त्यावर उतरावे लागले आहे.

पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने सुरुवातीला सिडको प्रशासनाकडे पत्र व्यवहार करून धरणे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आणि तसे निवेदन सिडको प्रशासनाला दिल्यानंतर सिडकोने सकारात्मक प्रतिसाद देत धरणे आंदोलन स्थगित केले. यानंतर पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी देखील विमानतळाला दिबांचेच नाव लागणार असल्याचे आश्वासित केले. असे असतानाही विमानतळाला दिबांचे नाव लागलेच पाहिजे या हट्टासाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे पदाधिकारी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमानन व हवाई उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना निवेदन देण्यासाठी आले असता, नायडू यांच्या कार्यालयाकडून देखील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे पदाधिकारी दिल्ली येथे आले असताना, रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत पनवेलच्या या एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आणि दिबांच्या नावासाठी सुरु केलेल्या लढ्याची दखल घेत प्रशंसा केली. त्यामुळे पत्रकारांचे मनोबल देखील वाढले असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमानन व हवाई उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देखील संस्थेच्यावतीने निवेदने देण्यात आली आहेत. यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे जेष्ठ पत्रकार विजय कडू, विवेक पाटील, संजय कदम, निलेश सोनावणे, केवल महाडिक, राज भंडारी, प्रकाश म्हात्रे, विशाल रावसाहेब सावंत, गणपत वारगडा, शंकर वायदंडे, आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
