कळंबोलीतील वाहतूक कोंडीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वाहतूक शाखेला निवेदन


4kNews कामोठे
पनवेल,  दि. २७ (वार्ताहर) : कळंबोली परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, या प्रश्नावर वाहतूक विभागाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कळंबोली विभागातर्फे करण्यात आली आहे. विभागप्रमुख विश्वास पेटकर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक करण शिकलगार यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले.


कळंबोली परिसरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढल्याने नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठा वेळ वाया जात असून, विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आगामी गणेशोत्सव व इतर उत्सवांच्या पार्श्वभूमीवर या वाहतूक समस्येवर योग्य नियोजन न केल्यास नागरिकांना आणखी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, अशीही भूमिका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.


निवेदनामध्ये बिमा कॉम्प्लेक्सकडून कलंबोलीच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी, मॅकडॉल परिसरातून कळंबोलीमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारी समस्या तसेच काम्बोट्या पुलाखालून येणाऱ्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अडथळ्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. या तिन्ही ठिकाणी वाहतुकीचे योग्य नियमन, वाहतूक पोलिसांची प्रभावी नियुक्ती आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. 


नागरिक वस्तीतील रहिवाशांना दैनंदिन जीवनात वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत असल्याने शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार व व्यावसायिक यांना वेळेवर इच्छित स्थळी पोहोचणे कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे उत्सवांच्या काळात वाहतुकीचे स्वतंत्र नियोजन करून कोणत्याही नागरिकाला अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता वाहतूक शाखेने घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.


हे निवेदन उपनेते बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील आणि भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. कलंबोली विभागप्रमुख विश्वास पेटकर यांनी वाहतूक समस्येचे गांभीर्य वाहतूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत नागरिकांच्या हितासाठी तातडीने सकारात्मक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महिला शहर संघटिका ज्योतीताई मोहिते, अरविंद कडव, महेश गुरव, विक्रम ठाकरे, किरण ढवळे, सुनील ठोंबरे, अरुण कदम, प्रदीप पाटील तसेच शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कळंबोलीतील नागरिकांच्या वाहतूक समस्येवर लवकरच ठोस उपाययोजना होतील, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top