4KNews कामोठे
कळंबोली, दि. २७ (वार्ताहर) : रायगडचे पालकमंत्री तथा महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांची पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल येथे भेट घेतली. यावेळी पनवेल तालुक्यात प्रस्तावित असलेल्या बहुउद्देशीय पत्रकार भवनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन मंचाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पालकमंत्र्यांना देण्यात आले.

पनवेल तालुका पत्रकार विकास मंच गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांच्या हितासह विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. पर्यावरण संवर्धन, रक्तदान शिबिरे तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी उपक्रम मंचाच्या वतीने केले जातात. या सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासाठी बहुउद्देशीय पत्रकार भवन उभारण्याचा मंचाचा मानस आहे.

यासाठी शासनाकडून भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गोगावले यांनी मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्याचे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी मंचाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार दीपक घोसाळकर, ‘सिटीबेल’चे संपादक विवेक पाटील, पत्रकार संजय कदम, दत्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

