लोना इंडस्ट्रीज कामगार संघर्षाला सकारात्मक वळण

4kNews कामोठे दि. 31
पनवेल (वार्ताहर ):
रसायनी येथील लोना इंडस्ट्रीज लि. मधील कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्काच्या लढ्याला अखेर सकारात्मक दिशा मिळाली असून, कंपनी व्यवस्थापनाने एक महिन्याच्या आत ठोस निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलनासह आत्मदहनाचा इशारा देत कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी व्यवस्थापनावर तीव्र दबाव कायम ठेवला आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासून विविध कंत्राटदारांमार्फत सेवा देणाऱ्या कामगारांना कंपनीच्या थेट पे-रोलवर घेण्यात यावे, तसेच शासन नियमानुसार वेतनवाढ व मूलभूत सुविधा मिळाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी कोकण श्रमिक संघाच्या वतीने साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. १७ ते १८ वर्षे निष्ठेने सेवा बजावणाऱ्या या कामगारांवर अन्याय होत असल्याची भावना यावेळी तीव्र झालेली पाहायला मिळाली.
आज दि. ३० मार्च २०२६ रोजी कंपनी गेटसमोर आंदोलनाची ठिणगी पडण्याआधीच पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करत सकारात्मक भूमिका घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल  व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ
यांच्या उपस्थितीत कामगार नेत्या श्रुती म्हात्रे व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संदीप गुप्ते व रमेश बर्गे या दोन्ही जनरल मॅनेजर आणि मानव संसाधन विभाग विकास भगत व समीर भालेकर यांच्यात तब्बल २ ते ३ तास सखोल चर्चा पार पडली.
या चर्चेत २२ कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघाला असून, टप्प्याटप्प्याने सर्व कामगारांना कायमस्वरूपी करण्यासह त्यांच्या वेतन व सुविधा संदर्भातील मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन कंपनीकडून देण्यात आले.


मात्र, या आश्वासनावर समाधान मानत असतानाही कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर कंपनीने पुन्हा चालढकल केली, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. गरज पडल्यास आत्मदहनासारख्या टोकाच्या पावलालाही सामोरे जावे लागेल.”
या आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कामगारांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला. संघर्षाच्या या टप्प्यावर कामगारांच्या ऐक्याची ताकद स्पष्टपणे दिसून आली.
दरम्यान, कामगार प्रतिनिधी सचिन मते यांनी प्रशासन व व्यवस्थापनाने संवादाची दारे उघडी ठेवत कामगारांना न्याय मिळवून देण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
या आंदोलनात सरपंच रंजना विश्वनाथ गायकवाड , मा. प. समिती जगदीश पवार ,मा. उपसरपंच रिया माळी ,मालती वाघमारे, मा.सरपंच शिवाजी माळी,संतोष वाघमारे ,संदिप  दळवी, विनायक भोईर ,संदेश मते ,अजित माळी,विश्वनाथ गायकवाड, प्रकाश वाढवे, राजेश माळी ,बंडू मांडवकर , विकी पाठारे , नित्यानंद म्हात्रे, राजू माळी ,अविनाश कोंडलकर, विनोद कांबळे , जयवंत पाटील, दत्तात्रेय गरुडे आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
कामगारांच्या हक्कासाठी उभा राहिलेला हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top