क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा रोटरीतर्फे सन्मान

4kNews कामोठे दि. 14

व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६ ने गौरव; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या वतीने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल नितीन ढमाले, आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.



यावेळी PDG रो. डॉ. शैलेश पालेकर यांनी दिनेश लाड यांची मुलाखत घेतली. आपल्या क्रिकेट प्रवासाबाबत बोलताना लाड यांनी नोकरीपासून क्रिकेट प्रशिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला. रमाकांत आचरेकर हे आपले गुरू नसून ‘सर्वस्व’ असल्याचे त्यांनी नमूद केले.



रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगताना लाड यांनी त्याच्या गोलंदाजीतील गुणवत्ता ओळखून फलंदाज म्हणून संधी दिल्याचे सांगितले. रोहितला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी तसेच त्याच्या प्रशिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. रोहित शर्मा २०२७चा विश्वचषक खेळेल, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला.



शार्दूल ठाकूर, अतिफ अत्तरवाला यांच्यासह अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देताना शुल्क न घेता मदत केल्याचे त्यांनी सांगितले. लाड फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या २६ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले आहे. वैभव सूर्यवंशी प्रतिभावान फलंदाज असून त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्येही स्वतःला सिद्ध करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी लाड यांच्या कार्याचे कौतुक करून मुंबईत मैदान उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी PDG डॉ. गिरीश गुणे, डॉ. दीपक पुरोहित, डॉ. हळदीपुरकर, मंजू फडके, DGN विवेक दीक्षित यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी, असिस्टंट गव्हर्नर, विविध क्लबचे अध्यक्ष व रोटेरियन उपस्थित होते. सूत्रसंचालन रो. धानी तन्ना यांनी केले, तर आभार डॉ. जयश्री पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धीप्रमुख रो. प्रशांत माने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top