पनवेल दि. ३० जुलै (4K समाचार )पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री. मंगेश चितळे यांना आज कॉलनी फोरम तर्फे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन माजी नगरसेविका व कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांच्या नेतृत्वाखालील ५० जणांच्या शिष्टमंडळाने दिले.

या वेळी फोरमने स्पष्ट केले की, “१ ऑक्टोबर २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीतल्या मालमत्ता कराचा भरणा करण्याचा आग्रह सोडावा, कारण ही बाब न्यायप्रविष्ट असून नगरविकास विभागाच्या निर्णयासाठी प्रलंबित आहे.”

तसेच त्यानंतरच्या तीन आर्थिक वर्षांचा मालमत्ता कर वेगळा दाखवून ९०% शास्ती माफीची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळाने आणखी एक महत्वाचा प्रस्ताव मांडला की, “नागरिकांकडे जेवढी शक्य आहे तेवढ्या रकमेवरच ९०% शास्ती माफी लागू करून मालमत्ता कर स्वीकारावा.”
या निवेदनावर आयुक्तांनी पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत कॉलनी फोरमने सर्व मालमत्ता धारकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, “न्यायप्रविष्ट कालावधीतील मालमत्ता कर कोणीही भरू नये.”

शिष्टमंडळात कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक मधु पाटील, कामोठे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश अढाव, कार्याध्यक्ष समाधान काशीद, शहर संघटक अरुण जाधव, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष जयवंत खरात, खारघर समन्वयक बालेश भोजने, सौ. अनिता भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
