पनवेल दि. 30 4k समाचार संजय कदम (प्रतिनिधी) – नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नव्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर कामोठे पोलीस ठाण्याची पुनर्वाटणी खारघर विभागात केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, शिवसेनेचे स्थानिक नेते आणि पोलिस मित्र चंद्रशेखर सोमण यांनी नुकतीच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सोमण यांनी आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून कामोठे पोलीस ठाणे पुन्हा पनवेल विभागातच ठेवण्याची जोरदार मागणी केली.

या भेटीत त्यांनी आयुक्त भारंबे यांचे नवीन जबाबदारीसाठी अभिनंदन करत, नव्याने जाहीर झालेल्या पोलीस विभागाच्या पुनर्रचनेवर सविस्तर चर्चा केली. सोमण यांनी सांगितले की, गेले ३० वर्षांहून अधिक काळ ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाशी विविध सुधारणा उपक्रमांद्वारे संलग्न राहिले आहेत आणि त्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे.

या चर्चेच्या दरम्यान आयुक्त भारंबे यांनीही सविस्तर भूमिका मांडत, कामोठे ठाण्याच्या नव्या वर्गवारीबाबत पुनर्विचार केला जाईल, असे सांगितले. तसेच, त्यांनी तत्काळ पनवेल विभागाच्या उपायुक्तांना याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या निर्णयामध्ये इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दींचाही आढावा घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

याच बैठकीदरम्यान सोमण यांनी सध्या महानगर टेलिफोन सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना पोलीस ठाण्यांशी संपर्क साधण्यात होणाऱ्या अडचणीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी प्रत्येक पोलीस ठाणे व वरिष्ठ कार्यालयांसाठी एक स्वतंत्र मोबाईल नंबर देऊन, तो क्रमांक जनतेसाठी जाहीर करण्याची मागणी केली.

तसेच, सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्यासोबतही चंद्रशेखर सोमण यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक उपक्रमांवर चर्चा केली. येनपुरे यांनी या सूचनांचे स्वागत करून लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही दिली.
या पुढाकारामुळे नवी मुंबई पोलीस प्रशासनाच्या कामकाजात सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
