पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः वसुंधरा फाउंडेशनच्या पर्ण दिवाळी अंकाच्या वतीने देण्यात येणारा पर्ण सन्मान पुरस्कार 2024 साहित्यिक आणि भाषा विभागाच्या उपसंचालक अंजली ढमाळ यांना ज्येष्ठ साहित्यिक आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त किरण कुलकर्णी यांच्या हस्ते आणि जेएनपीटी महाप्रबंधक (विपणन) अंबिका सिंह, ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे, लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला .पनवेल येथे आयोजित या पर्ण सन्मान पुरस्कार सोहळ्याकरिता बालसाहित्यिकांपासून सर्व साहित्यिक आणि श्रोत्यांची मांदियाळी जमली होती.

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठीचा जागर या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला. बालसाहित्यिकांच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम काव्यपर्ण, साहित्य दिंडी आणि मान्यवरांची भाषण यामुळे मराठी भाषेचा हा उत्सव असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले
साहित्य संस्कृती आणि वास्तव या ब्रीदवाक्यानुसार कार्यरत साहित्यिकाला दरवर्षी पर्ण सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे .डॉ . किरण कुलकर्णी यांनी भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध पातळ्यांवर दर्जेदार असे प्रयत्न व्हायला हवेत.

वसुंधरा फाउंडेशन आयोजित केलेला काव्यपर्ण हा कार्यक्रम मराठी भाषा टिकवण्यासाठी चा एक उत्तम प्रयोग असून या कार्यक्रमात सादर झालेल्या बाल साहित्यिकांच्या कविता म्हणजे शब्दधनाची मेजवानीच असल्याचे मत साहित्यिक आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार महावीर जोंधळे यांनी मराठी साहित्याच्या अभिरुची साठी सर्वांनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे असं सांगून अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर सुद्धा मराठी शाळा बंद पडत आहेत मराठी भाषा शिकवणारे शिक्षक कसे तयार होतील हा प्रश्न निर्माण झाला आहे दर पंधरा किलोमीटरवर भाषा बदलते भाषेचं हे विविधत्व जतन करावे लागेल इंग्रजी भाषेच्या शाळा खेडोपाडी गेल्या आणि मुठभर लोक मात्र मराठी बद्दल आस्था बाळगून आहेत याबाबतचे वास्तव मांडले ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी सुद्धा माणूस म्हणून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे जात धर्म या पलीकडे जाऊन विचार करायला हवा आजची पिढी स्मार्ट आहे मात्र त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पर्ण दिवाळी अंक 2024 च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ डॉक्टर किरण कुलकर्णी अंबिका सिंह यांच्या हस्ते यावेळी पार पडला.

कथा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे -प्रथम क्रमांक स्वाती वैद्य ,द्वितीय क्रमांक विभागून -दिलीप अपशंकर ,डॉक्टर अभय वळसंगकर तृतीय क्रमांक विभागून-डॉ .क्षमा शेलार अद्वैत सोवळे उत्तेजनार्थ -अनिरुद्ध धोंगडे ,प्राध्यापक रमेश कोटस्थाने ,सुप्रिया वारे ,गायत्री मुळे ,अविनाश गडवे, किशोरी उपाध्ये, सचिन मनेरीकर. नमिता बुवा यांनी गायलेल्या प्रेरणा घेताना कार्यक्रमाला सुरुवात झाली . सूत्रसंचालन शार्दुल बुवा यांनी केले प्रास्ताविक संपादक अपर्णा नाडगौडी यांनी केले, तर आभार कार्यकारी संपादक प्रशांत कुलकर्णी यांनी मानले. मानपत्राचे वाचन अर्चना जोशी यांनी केले. उपसंपादक कीर्ती जोशी प्रसिद्ध कथा लेखिका सुचिता घोरपडे ,श्रद्धा चमके, स्वाती गोडसे ,सुधीर नाडगौडी यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. अमिता म्हसकर विनिता शेटे जानवी करंदीकर नमिता बुवा अर्चना जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
