4k समाचार
पनवेल, दि.5 (संजय कदम) ः पनवेल भगिनी समाज या महिलांच्या एका संस्थेने 1 ऑगष्ट 2025 रोजी 100 वर्ष पूर्ण करून, तो वर्धापन दिन वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रथम मंडळाच्या अध्यक्षा मनीषा भिडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नंतर एक सभासद भगिनी सुनीती साठे, यांनी समाजासाठी सर्व देवांना आवाहन रुपी प्रार्थना लिहिली आहे. तीच प्रार्थना सर्व भगिनींनी म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रार्थनेनंतर अर्चना कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्या नंतर मंडळाच्या हितचिंतक असणार्या सुनीता जोशी यांनी भगिनी समाजाची आजपर्यंतची वाटचाल एका पोवाडारूपी कवितेतून रचली, ती सेक्रेटरी वैशाली कुलकर्णी व सहकारी यांनी तालात आणि रसिकांनी धरलेल्या टाळ्यांच्या ठेकात सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली, त्यामुळे मंडळात काय काय उपक्रम चालतात याची कल्पना आली. त्यानंतर उपाध्यक्षा रजनी भानू यांनी भगिनी समाजाच्या स्थापने पासून आजपर्यंत, म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पर्यन्त ऐकूण काय काय उपक्रम घेतो याची सविस्तर माहिती सांगितली. त्यातून संस्कृती परंपरा जतन, धार्मिक उत्सव, सामाजिक बांधिलकी जपण्यासारखे अनेक उपक्रम राबवतो.

तसेच संस्कार हे लहान मुलांवर करायला हवे हे लक्षात घेऊन स्वतःची बालवाडी 1965 मध्ये सुरू केली ती 2005 पर्यन्त अव्याहतपणे सुरू ठेवली होती. एक वेळ अशी आली होती की संख्या वाढत होती आणि जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे दोन सत्रात वर्ग भरावे लागत होते. मोठा शिशु सकाळी 9 ते 12, आणि छोटा शिशु दुपारी 12.30 ते 3.30 अशा वेळेत वर्ग होऊ लागले. तरीही 60 पटसंख्येच्या वर मुलं प्रवेश घेण्यासाठी येत असत, आणि जागेअभावी त्यांची निराशा होत असे. 1980 मध्ये भगिनींच्या मनात ही शाळा जेष्ठराज गणपती मंदिरात भरत होती, त्याकरिता आमच्या भगिनींना शाळेसाठी स्वतःची वास्तू व्हावी या धेय्याने पछाडलं.

आमच्या जेष्ठ भगिनी नऊवारी साडी नेसून घरोघरी, बाजारात, दुकानांतून वास्तू साठी वर्गणी गोळा करायला बाहेर पडल्या. त्यांच्या एकीतून आणि चांगलं शिक्षण देणारी शाळा या शाळेच्या पसरलेल्या किर्तीतून वर्गणी जमली आणि मंडळाची स्वतःची वास्तू आमच्या हातात 1988 मध्ये आली तिथे बालवाडी सुरू झाली.आमच्या भगिनींना एक वटवृक्षच लाभला, त्याच्या छायेत आमचे कार्यक्रम होऊ लागले. इथे महिलंच्या विकासासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून त्यांचे वक्तृत्व, बौद्धिक, सभाधिटपणा या गुणांचा विकास होत होता. त्यातूनच रामदास मारुती मंदिर, टिळक रोड, पनवेल इथे दासनवमी उत्सव असतो. त्यामध्ये दुपारी खास फक्त महिलांसाठी कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमात आमच्या भगिनी भाग घेऊन एक सुंदर नाटिका सादर करतात. यावर्षी म्हणजे 14 फेब्रुवारी 2025, या दिवशी दासनवमी उत्सवाच्या दुसर्या दिवशी आम्ही 28 (अठ्ठावीसावी) नाटिका सादर केली. याचे वैशिष्टय म्हणजे नाटिकेतील पुरुष पात्राचे काम आमच्या भगिनीच सादर करायच्या. ही प्रथा पनवेल मधील 100 वर्षे अविरत कार्यरत असणार्या आमच्या भगिनींनीच सुरू केली याचा आम्हाला खूपच अभिमान वाटतोय. नंतर रसिक प्रेक्षकांना काही सूचना उमा आपटे यांनी केल्या, शेवटी आभार प्रदर्शन रमा अभ्यंकर यांनी केले.

या सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवण्याचं काम म्हणजेच सूत्रसंचालन आमच्या सभासद भगिनी आदिती मराठे यांनी केले. अशा या वटवृक्ष रुपी मंडळाचा आम्हाला कायमच अभिमान राहील. मंडळाच्या शतकपूर्ती सोहळ्या निमीत्ताने पनवेल मधील नाट्यरसिकांसाठी ’ नियम व अटी लागू ’ हा दोन अंकी नाट्यप्रयोग विनामूल्य दाखवण्यात आला, व नंतर वर्धापन दिनानिमित्त सर्व प्रेक्षकांसाठी खाऊ वाटप झाले. मंडळाच्या सर्व महिला वर्गाने हा सर्व कार्यक्रम कुठेही गडबड गोंधळ न होता यशस्वीपणे पूर्ण केला.
