4k समाचार दि. 9
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने साक्षरता दिनाच्या औचित्याने वृक्ष संवर्धन साक्षरता दिनाचे आयोजन आज येथे करण्यात आले होते. इंडियन ऑइल, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते “माझे झाड” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

वृक्ष पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत सत्कार झाल्यानंतर पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष मंदार दोंदे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या नियोजनाची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मनोगतातून मांडले. आज सुरू केलेल्या अभियानाच्या अनुषंगाने पुढील १० वर्षानंतर रुजलेल्या आणि वाढलेल्या झाडांच्या सानिध्यात आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भेटूयात अशी अपेक्षा व्यक्त केली.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार विक्रांत पाटील यांनी वृक्ष संवर्धनाचे महात्म्य कथन केले तसेच पनवेल तालुका पत्रकार विकास मंच पनवेल महानगरपालिका आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने केल्या जाणाऱ्या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या उपक्रमांतर्गत पनवेल महापालिका हद्दीत १०० बहुवार्षिक वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेचे उद्यान विभाग यांच्या समन्वयाने सदर वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी,इंडियन ऑइलचे पश्चिम विभाग एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पी. त्रिपाठी, इंडियन ऑइल एव्हिएशन विभागाचे जनरल मॅनेजर रत्नशेकर भट्टाचारजी, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ चे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले,

पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक एड. मनोज भुजबळ, इंडियन ऑइल चे पश्चिम विभाग कॉर्पोरेट कम्युनिकेशन जनरल मॅनेजर अभिषेक कुमार, पश्चिम विभाग कॉर्पोरेट कम्युनिकेशन अधिकारी अनिल नागवेकर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, प म पा उद्यान विभागाचे वतीने सिद्धार्थ कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सल्लागार विवेक पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, प्रविण मोहोकर, नितीन कोळी,राजू गाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
