4kNews कामोठे दि. 27
पनवेल (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग, तालुका विधी सेवा समिती, पनवेल आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांचे विशेष व्याख्यान व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे होणार आहे. न्यायमूर्ती अभय ओक प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कायदा व न्यायव्यवस्थेतील विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असून, यावेळी त्यांची विशेष मुलाखतही घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबागचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास बी. अग्रवाल राहणार आहेत. जिल्हा न्यायाधीश-१ तथा तालुका विधी सेवा समिती, पनवेलचे अध्यक्ष विमलनाथ सा. तिवारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती म. कंटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कायदा व न्याय क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा लाभ वकील, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रत्नदीप राम पाटील व कार्यकारिणीने केले आहे. पत्रकार परिषदेला सचिव ॲड. प्रल्हाद खोपकर, उपाध्यक्ष ॲड. सचिन म्हात्रे, सहसचिव ॲड. दिपाली गावंड, खजिनदार ॲड. धनराज तोकडे, सहखजिनदार ॲड. विशाल डोंगरे, ऑडिटर ॲड. भूषण म्हात्रे तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

अभय ओक यांचा न्यायक्षेत्रातील ठसा
न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक हे कायदा, नागरिकांचे मूलभूत अधिकार, पर्यावरण संरक्षण आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारख्या विषयांवरील स्पष्ट व अभ्यासपूर्ण भूमिकेसाठी परिचित आहेत. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम केले. न्यायदान प्रक्रियेत प्रादेशिक भाषांचा वापर वाढावा, तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्यायव्यवस्था अधिक सुलभ व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने भूमिका मांडली.

