पनवेल दि.१९(वार्ताहर): कळंबोली येथील केएलई सोसायटीच्या केएलई कॉलेज ऑफ लॉतर्फे राष्ट्रीय कायदा महोत्सव स्पार्कल 6.0 चे आयोजन 22 मार्च रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवात मूट कोर्ट स्पर्धा आणि क्लायंट कौन्सिलिंग स्पर्धा या दोन प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून 30 टीम यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या प्राथमिक आणि ऑक्टा-फायनल फेरी ७ व ८ मार्च २०२५ रोजी ऑनलाइन स्वरूपात पार पडल्या, जिथे देशभरातील नामवंत कायदेतज्ज्ञ आणि न्यायमूर्तींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. आता सर्वांचे लक्ष २१ व २२ मार्च रोजी केएलई कॉलेज ऑफ लॉ, कळंबोली येथे होणाऱ्या उपांत्य व अंतिम फेरींवर लागल्या आहेत.

यावेळी अरविंद कुमार (न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय), पी.एस. दिनेश कुमार ( माजी मुख्य न्यायाधीश, कर्नाटक), मिलिंद जाधव (न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय), डॉ. सोमू सी.एस. (प्राध्यापक) डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन, केएलई सोसायटी, बेळगावी) प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे आणि सखोल मूल्यांकन ऐकण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रिन्सिपल दिनकर गीते यांनी केले आहे. सार्क देशांमध्ये न्याय वितरण प्रणालीवरील आंतरराष्ट्रीय परिसंवाद २४ मार्च रोजी दुपारी २ वाजता कळंबोली, केएलई कॉलेज ऑफ लॉ येथे आयोजित केला आहे. या परिसंवादात भारत आणि श्रीलंकेतील पाहुणे सार्क राष्ट्रांमधील न्याय वितरण प्रणालीवर चर्चा करणार आहेत.

या परिसंवादाचा उद्देश सार्क प्रदेशातील कायदेशीर तज्ञांमध्ये संवाद आणि सहकार्य वाढवणे आहे, श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.एच.एम.डी. नवाज, आयआययूएलईआर, गोव्याचे कुलगुरू प्रा. (डॉ.) आर. वेंकटराव आणि अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबईच्या लॉ स्कूलचे संचालक प्रा. डॉ. जी जी मोहन व्ही.एस. या कार्यक्रमात वक्ते म्हणून उपस्थित राहतील. या परिसंवादात शिक्षणतज्ज्ञ, कायदेशीर व्यावसायिक, वकील, कायद्याचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
