4k समाचार दि. 12
नवी मुंबई – रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडे जाण्याचा आनंद काही तासांतच दु:खात बदलला. सायगांव येथील सिद्धांत सायगांवकर (वय २५) हे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी पनवेलला जात असताना सोमवारी सकाळी रेल्वे प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेवर चोरट्याने हात साफ केला. या बॅगेत लाखोंच्या किमतीचा लॅपटॉप, महागडे मोबाईल फोन, चार्जर्स, तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे होती.

ही घटना मुंबईतील सायन स्थानकाजवळ घडली. सिद्धांत हे स्थानकावर पोहोचण्याआधीच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग उचलून नेली. बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली.

या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. प्रवासादरम्यान बॅग चोरी झाल्याने केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर महत्त्वाची वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे गमावल्यामुळे सायगांवकर यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना इशारा दिला आहे की, सणासुदीच्या काळात गर्दी वाढल्याने अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढतात. त्यामुळे प्रवाशांनी आपली मौल्यवान वस्तू व सामान नेहमी नजरेसमोर ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
