4kNews कामोठे दि. 12
पनवेल : खारघर सेक्टर-१२ येथील एका ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ कोटी ६४ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये हिरे, सोन्याचे आणि प्लॅटिनमचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर सेक्टर-१२ मधील सीआयएसएफ रोडवरील उत्सव चौक परिसरातील साई कृपा प्रिमायसेस इमारतीत कॅन्डीअर लाईफस्टाईल ज्वेलर्स हे दुकान आहे. १० ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करण्यात आले होते. मंगळवारी (११ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी दुकानाचे शटर हत्याराच्या साहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दुकानातील ६८ लाख ९१ हजार ७७९ रुपये किमतीचे हिऱ्यांचे १३९ दागिने, १५ लाख ५७ हजार ३७९ रुपये किमतीचे सोन्याचे २७ दागिने, ७९ लाख ५५ हजार ८१७ रुपये किमतीचे प्लॅटिनमचे ४८ दागिने तसेच कॅश काउंटरमधील ३० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ कोटी ६४ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचा ऐवज लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

या प्रकरणी दुकानाचे फिर्यादी नितीन सुधाकर वांदे यांच्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७१/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ तसेच जुन्या भारतीय दंड संहितेतील कलम ४५४, ४५७ आणि ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साईप्रकाश चन्ना यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.

