4kNews कामोठे
पनवेल, दि. 13 (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर व सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या कामकाजाबाबत निवडणूक प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
एसआयआर कार्यक्रमानुसार बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) किमान तीन वेळा मतदारांच्या घरी जाऊन मतदार नोंदणी व आवश्यक माहितीची पडताळणी करणे अपेक्षित आहे. मात्र, पनवेल विधानसभा मतदारसंघातील शहरी भागात नेमण्यात आलेले अनेक बीएलओ अद्याप कोणत्याही मतदाराच्या घरापर्यंत पोहोचले नसल्याचे निदर्शनास आले असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

याबाबत योग्य ती कारवाई करून १७ ऑगस्टपर्यंत दिलेल्या मुदतीत बीएलओंना तातडीने मतदारांच्या घरी जाऊन मतदार नोंदणी व पडताळणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे लेखी निवेदन पनवेल विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी पवन चांडक यांना देण्यात आले.
जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात पनवेल महानगरपालिकेतील शिवसेनेच्या गटनेत्या लीना ताई गरड, महानगरप्रमुख ॲड. समाधान काशीद, विभागप्रमुख प्रवीण जाधव, रामदास गोवारी यांचा समावेश होता.

पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ नयेत आणि प्रत्येक मतदारापर्यंत बीएलओ पोहोचावा, यासाठी निवडणूक प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

