ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक व पुरोहित सुधाकर ठाकूर यांचे निधन.


4kNews कामोठे
उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील खोपटे बांधपाडा परिसरातील हसमुख, मनमिळावू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व कैलासवासी सुधाकर केशव ठाकूर यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
सुधाकर ठाकूर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार व शिक्षण दिले. गिरोबा देवावर त्यांची नितांत श्रद्धा होती. श्रीक्षेत्र खोपटे ग्रामदेवता गिरोबा देवाची आरती त्यांच्या लेखणीतून साकारली असून, १९८०च्या दशकात स्थापन झालेल्या गिरोबा देव स्फूर्ती मंडळाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता.रंगभूमीशीही त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. 

  त्यांच्या लेखणीतून अनेक सामाजिक व विनोदी नाटके साकारली आणि सिद्धेश्वर नाट्य मंडळाच्या माध्यमातून ती रसिकांसमोर आली. उत्तम डावखुरे फलंदाज व हॉलीबॉलपटू म्हणूनही त्यांनी क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला.
पुरोहित म्हणून त्यांनी शास्त्र, मंत्र व पुराणांचा सखोल अभ्यास करून अभिषेक, विवाह, गणेशपूजन, वास्तुपूजन, सत्यनारायण पूजा व मंदिरातील विविध धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले. त्यांच्या ज्ञानामुळे आणि भक्तिभावामुळे अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले होते.


त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ठाकूर कुटुंबासह बांधपाडा परिसराची मोठी हानी झाली आहे.कला, साहित्य, क्रीडा आणि धार्मिक क्षेत्राला समृद्ध करणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांच्या कार्याच्या आणि आठवणींच्या रूपाने ते सदैव स्मरणात राहतील असे ते व्यक्तिमत्व होते.अशा या व्यक्तिमत्वाला म्हणजेच कैलासवासी सुधाकर केशव ठाकूर यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक संस्था संघटनानीं भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top