मुंबई, दि. 4 (अजित मोहिते) : भारताला स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाजबांधणी व सागरी क्षमता असलेले राष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नांत शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI)ने अग्रणी भूमिका बजावावी, असे आवाहन केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी केले.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथे SCIच्या ६५ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सोनोवाल यांनी SCIच्या राष्ट्रसेवेचे कौतुक करताना भारताची ऊर्जा व व्यापार सुरक्षा तसेच अलीकडील हॉर्मुझ सामुद्रधुनीतील संकटाच्या काळात कंपनीने बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख केला.
मेरीटाइम अमृत काल व्हिजन २०४७’अंतर्गत भारताला आघाडीच्या जहाजबांधणी व जहाजमालकी असलेल्या राष्ट्रांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी मजबूत राष्ट्रीय ताफा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. SCIचा ताफा, कर्मचारी आणि विविध भागीदारी या उद्दिष्टासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असेही सोनोवाल यांनी नमूद केले.

१९६१ मध्ये १९ जहाजांसह सुरू झालेली SCI आज ५८ जहाजे आणि ५.२६ दशलक्ष डेडवेट टनेज (DWT) क्षमतेचा विविधांगी सागरी समूह बनली आहे. तेल व पेट्रोलियम वाहतूक, बल्क व कंटेनर शिपिंग, LPG-LNG वाहतूक, ऑफशोअर सेवा, प्रवासी व किनारी वाहतूक, प्रकल्प मालवाहतूक तसेच जहाज व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत कंपनी कार्यरत आहे.
महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश नारायण राणे यांनी SCIचे महाराष्ट्र व मुंबईशी असलेले दीर्घकालीन संबंध अधोरेखित केले. MoPSWचे सचिव विजय कुमार यांनी ऑनलाइन संबोधित करताना राष्ट्रीय गरजेच्या काळात SCIने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले.

SCIचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी. के. त्यागी यांनी कंपनीच्या ताफा विस्ताराच्या योजनांची माहिती दिली. आधुनिक व स्पर्धात्मक ताफा उभारण्याबरोबरच धोरणात्मक भागीदारी आणि पर्यावरणपूरक जहाजवाहतुकीवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

