पनवेल,दि.6: कामोठे(4kNews) महानगरपालिका क्षेत्रात 21 व्या पशुगणनेस सुरूवात होत आहे. ही पशुगणना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल ॲपच्या माध्यमातून केली जाणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी या पशुगणनेस सहकार्य असे आवाहन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी केले आहे.
या पशुगणनेच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कोटुंबिक उपक्रम,गोशाळा आणि संस्था यांच्याकडे असलेले पशुधनाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या पशुगणनेमध्ये पनवेल क्षेत्रात आढळणाऱ्या पशुधनाच्या 16 प्रजातीची जातिनिहाय वयोगट तसेच लिंगनिहाय व उपयोगानुसार आकडेवारी गोळा केली जाणार आहे. या पशुगणनेमध्ये गाय-म्हैस, शेळी-मेंढी, घोडे, श्वान इत्यादी व कुक्कुट पक्षी जसे की कोंबडया, बदक इत्यादीचा समावेश असणार आहे.

या पशुगणनेमुळे विविध फायदे होणार असून त्यानुसार धोरण तयार करता येणार आहे. या पशुगणनेमुळे दुध, अंडी, मांस व लोकर इ. पशुजन्य उत्पादनाचा अंदाज करता येणार असून याचबरोबर त्यांच्या लसीकरणचा कार्यक्रम राबविता येणार आहे. पशुगणनेनूसार पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ठरविणे विविध योजना राबविणे शक्य होणार आहे.

या पशुगणनेमुळे पशुधन क्षेत्रातील उद्योन्मुख कल आणि भविष्यातील व्यवसाय संधी याविषयी विश्लेषण करता येणार आहे. या पशुगणनेमुळे विविध प्रदेश आणि समुदायांना त्यांच्या पशुधन संख्येवर व गरजांवर आधारित निधी , पायाभूत सेवा-सुविधा यासारख्या संसाधनांचे वाटप करण्यात मदत होणार आहे.
ही 21 वी पशुगणना 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पूर्ण होणार आहे. प्रगणकांना पशुगणनेची अचूक व संपूर्ण माहिती देवून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी केले आहे
