पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः कारचा दरवाजा अचानक उघडल्याने त्याला मोटरसायकलची धडक बसून दुचाकीस्वार काशिनाथ माने (वय 57) जखमी झाले. या अपघातप्रकरणी कारचालकाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काशिनाथ सुदाम माने हेरंब सोसायटी येथून हिरो ग्लॅमर मोटरसायकल (एमएच 06 एडी 4837) वरून पनवेल मार्केटला जात होते. या वेळी पांढर्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक (एमएच 43 बीएक्स 7938) ही रस्त्याच्या कडेला उभी करून चालकाने स्विफ्ट कारचा दरवाजा अचानक उघडला.

या वेळी माने हे मोटरसायकलसह दरवाजाला धडकले आणि खाली पडले. यात त्यांच्या खांद्याला आणि उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. याप्रकरणी कलीम मोबीन खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
