कामोठे, २७ जुलै २०२५ (रविवार) –
आज सकाळी ११ वाजता, शुभम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (प्लॉट नं. ५३, सेक्टर 6A, कामोठे) येथे पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात विशेष मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी कामोठे फोरमचे सन्माननीय कार्याध्यक्ष अॅडव्होकेट समाधान काशीद यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

अॅड. काशीद यांनी आपल्या सखोल आणि नेमस्त मार्गदर्शनातून सोसायटीतील सदस्यांसमोर महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीची सविस्तर माहिती मांडली. त्यांनी सद्यस्थितीतील कायदेशीर बाबी, टॅक्सचे गणित, प्रशासनाकडून उद्भवणारे संभ्रम आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यासोबतच, उपस्थित सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे त्यांनी थेट उत्तर देत समाधानकारक निरसन केले.

या बैठकीस केवळ शुभम सोसायटीतीलच नव्हे, तर कामोठेतील इतर सोसायट्यांतील पदाधिकारी आणि सदस्यही उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने अशा मार्गदर्शन सभा प्रत्येक सेक्टर किंवा सोसायटीत आयोजित होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि भीती दूर होईल आणि अन्यायकारक कर व्यवस्थेविरोधातील जनआंदोलन अधिक बळकट होईल, असेही मत अनेकांनी मांडले.

सभेच्या शेवटी एक महत्त्वाचा ठराव एकमताने पारित करण्यात आला – जोपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने प्रॉपर्टी टॅक्ससंदर्भातील नागरिकांच्या न्याय्य मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत कोणताही सदस्य मालमत्ता कर भरणार नाही. याशिवाय, सर्वांनी “कॉलनी फोरम”च्या पुढाकाराला पाठिंबा दर्शवत या लढ्यात एकजुटीने सहभागी राहण्याची ग्वाही दिली.

या उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सोसायटीचे प्रतिनिधी श्री. संदीप पवार यांनी अॅड. समाधान काशीद यांचे आभार मानले आणि त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली..
