4kNews कामोठे
धाकटा खांदा गावच्या लेकीची प्रशासकीय सेवेत झेप; सतीश पाटील यांनी घरी जाऊन केले अभिनंदन
पनवेल | प्रतिनिधी : संजय कदम धाकटा खांदा गावातील पूजा बाळकृष्ण म्हात्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत राज्य कर निरीक्षक पदावर निवड मिळवली आहे. ग्रामीण भागातील मुलीने स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शासकीय सेवेत जाण्याचे ध्येय निश्चित करून पूजा यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य वेळेचे नियोजन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या यशामुळे म्हात्रे कुटुंबीयांसह धाकटा खांदा गावात आनंदाचे वातावरण आहे.
पूजा यांच्या यशाची माहिती मिळताच भाजप ओबीसी मोर्चाचे पनवेल शहराध्यक्ष सतीश पाटील यांनी त्यांच्या धाकटा खांदा येथील निवासस्थानी भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांनी पूजा यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. योग्य नियोजन, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे पूजा यांच्या यशातून सिद्ध झाल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले.
पूजा म्हात्रे यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्यासाठी प्रेरणा मिळाली असून, धाकटा खांदा गावाच्या नावलौकिकातही भर पडली आहे.

