4kNews कामोठे
पनवेल, दि. १ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आरोग्य विभागाची भेट घेऊन तातडीने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली.

शिवसेना पनवेल विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे व खासगी रुग्णालयांना भेट देऊन आजारांच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मलेरिया तपासणीतील त्रुटी, तपासणी सुविधांची उपलब्धता तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. ३० ऑगस्ट रोजी झालेल्या आढावा बैठकीत शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, महानगर संघटक मंगेश रानवडे, खारघर शहर समन्वयक प्रणव कारखानीस व विभाग संघटिका ज्योती नाडकर्णी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर समस्या मांडल्या.

महापालिका प्रशासनाने मलेरिया तपासणी वाढविणे, धुरीकरण व फवारणीची वारंवारता वाढविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करणे तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाईन फ्लू तपासणी सुविधा सुरू करण्याचे आश्वासन दिले. ही आश्वासने १५ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्षात आणावीत, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला.

