4kNews कामोठे
पनवेल, दि.१ (वार्ताहर) : मालवाहतुकीसाठी देण्यात आलेल्या ४८ लाख ६० हजार रुपये किमतीच्या हायवा डंपरचा परस्पर अपहार करून विक्रीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अभिजीत भूपाल पवार यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा एमएच ११ सी ५०७५ क्रमांकाचा हायवा टिपर खडी व क्रश सँड वाहतुकीसाठी राजेश्वर (सचिन) दिपकराव जाधव याच्याकडे देण्यात आला होता. हा डंपर गव्हाण फाटा येथील नूर पार्किंगमधून परस्पर हलवून, मालकाच्या परवानगीशिवाय विक्री करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे.

पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या मदतीने शोध घेतला असता डंपर मध्य प्रदेशातील सेंधवा येथे असल्याचे आढळले. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून, आरोपी जाधव याला ठाणे येथून ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

