4kNews कामोठे दि. 6
पनवेल (प्रतिनिधी) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (स्वायत्त) सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील युवा संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. मुंबईतील श्रीमती पी.एन. दोशी महिला महाविद्यालयात १ सप्टेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत त्यांच्या पर्यावरणविषयक संशोधन प्रकल्पाला द्वितीय क्रमांक व चार हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले.

‘चिंतेपासून कृतीकडे : हवामान बदल आणि युवकांची सक्रिय भूमिका’ या विषयावर झालेल्या स्पर्धेत आलोक सिंग, कस्तुरी मनेवे आणि आकांक्षा ताम्हणकर यांनी ‘हवामान बदलाबाबतची चिंता आणि कृतीशीलता’ या विषयावर संशोधन प्रकल्प सादर केला.
मुंबई महानगर प्रदेशातील पर्यावरणीय बदल, युवकांमध्ये हवामान बदलाबाबत निर्माण होणारी चिंता आणि तिचे सकारात्मक पर्यावरणीय कृतीत रूपांतर करण्याच्या शक्यता यांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण, उपलब्ध माहिती आणि संबंधित संशोधनाचा आधार घेण्यात आला.

हवामान बदलाकडे केवळ चिंतेच्या दृष्टीने न पाहता युवकांना पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्यक्ष कृतीत सहभागी करण्यावर प्रकल्पात भर देण्यात आला. स्पर्धेदरम्यान पर्यावरणतज्ज्ञ स्टॅलिन डी., सुभजीत मुखर्जी आणि अफजल खत्री यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद झाला.
प्रा. जी. एस. साठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील, डॉ. बी. डी. आघाव, प्रा. एन. सी. वडनेरे तसेच विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

