4kNews कामोठे दि. 6
पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्यांमध्ये नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी रेवणसिद्ध ठेंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यापूर्वीचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली.

पदभार स्वीकारल्यानंतर ठेंगले यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा रोडवरील हॉटेल चालक तसेच सीएफएस कंटेनर यार्डच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत सूचना केल्या. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहतुकीच्या अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठेंगले यांनी यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तालयात काम केले असून, बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या २०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केल्याची माहिती आहे. या कामगिरीबद्दल त्यांना मुंबई पोलिसांकडून विविध पुरस्कारही मिळाले आहेत.

नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दीतील पळस्पे फाटा-खारपाडा, डेरवली-दांडपाडा तसेच कोन फाटा-रसायनी मार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गणेशोत्सव काळात विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचे ठेंगले यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीबद्दल कोनगाव, आजीवली, शेडुंग, शिरढोण व पळस्पे परिसरातील नागरिकांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

