4k समाचार दि. 10
वीरकरवाडी, ता. माण / घाणंद, ता. आटपाडी.देशसेवेत स्वतःला झोकून देत अनेक अडथळ्यांवर मात करून आदर्श निर्माण करणाऱ्या सौ. आशाराणी शंकर बनगर यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या समर्पित सेवेला मानाचा मुजरा करण्यात आला..


वीरकरवाडी, ता. माण येथील रहिवासी असलेल्या आशाराणी बनगर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CISF) प्रवेश केला. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सेवा बजावत त्यांनी राष्ट्रहितासाठी कार्य केले. केंद्रीय गृहमंत्री यांच्या सुरक्षेसारख्या जबाबदारीच्या कार्यातही त्यांनी निष्ठेने सहभाग घेतला. सध्या त्या नाशिक येथील करन्सी प्रेसमध्ये सेवा बजावत असून त्यांच्या कार्याचा लौकिक सर्वत्र झाला आहे.

त्यांचे पती शंकर बनगर हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून देशसेवेत योगदान देणारे हे दाम्पत्य अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. अशा सेवेची दखल घेऊन कराड येथील अहिल्यादेवी होळकर सामाजिक आणि शैक्षणिक संस्था यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रविण काकडे, माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला.
आपल्या सन्मानानंतर आशाराणी बनगर यांनी या सन्मानाचा स्वीकार करताना संस्थेचे अध्यक्ष प्रविण काकडे, शंकर विरकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ गौरव नाही, तर पुढेही देशासाठी निष्ठेने कार्य करण्याची प्रेरणा आहे,” असे त्यांनी सांगितले.

मुळच्या घाणंद, ता. आटपाडी येथील असलेल्या आशाराणी बनगर यांनी शिक्षणासाठी अनेक अडचणींवर मात केली. आर्थिक अडथळे, सामाजिक अडचणी आणि घरगुती जबाबदाऱ्यांवर विजय मिळवत त्यांनी आपल्या परिश्रमाने केंद्रीय पोलिस दलात स्थान मिळवले. त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना साथ दिली. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाची लहर पसरली असून त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.
कार्यक्रमात स्थानिक नागरिक, झंजे ,बनगर कुटुंबीय व महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. अनेकांनी त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. तरुण मुलींनी त्यांच्या कार्यातून धैर्य आणि आत्मविश्वास घेण्याची गरज असल्याचेही मत मांडले.
देशसेवेतील महिलांच्या योगदानाला उजाळा देणारा हा सन्मान कार्यक्रम निश्चितच पुढील पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे.
