4kNews कामोठे दि. 17
उद्योगांची बँक हमी वाढविण्यासह प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा होणार अभ्यास
पनवेल (प्रतिनिधी) : राज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच उद्योगांकडून घेतली जाणारी बँक हमी (डिपॉझिट रक्कम) वाढविण्याबाबत अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय समिती गठित केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

समिती औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, धोरणात्मक निर्णय आणि बँक हमीच्या रकमेत वाढ करण्याची आवश्यकता यांचा अभ्यास करणार आहे. यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी, औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि तज्ज्ञांचाही समितीत समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील प्रदूषणग्रस्त औद्योगिक क्षेत्रांचा आढावा घेऊन पर्यावरणीय नियमांचे प्रभावी पालन, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सक्षम करणे आणि उद्योगांचा विकास व पर्यावरण संरक्षण यामध्ये समतोल साधण्यासाठी समिती शासनाला शिफारशी करणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यापूर्वीही वायू प्रदूषणाच्या प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा केला आहे.

