पनवेल(4kNews) तालुक्यातील नेरे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या शांतीवन या संस्थेमध्ये इनरव्हील क्लब ऑफ पनवेल तर्फे अध्यक्षा डॉ. वीणा मनोहर यांच्या नियोजनातून मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर पार पडले.

या शिबिराचा ८० ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात शांतीवन येथील आधारगृह वृद्धाश्रम आणि कुष्ठरुग्ण यांच्या विविध तपासण्या करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने डोळ्यांची तपासणी, मधुमेह तपासणी, हाडातील कॅल्शियमचे प्रमाण तसेच रक्तदाब, दंतचिकित्सा इत्यादी विविध तपासण्या करण्यात आल्या. त्याचबरोबरीने त्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोफत वैद्यकीय सल्ला व औषधेही देण्यात आली.

.तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय तज्ञांनी ज्येष्ठ नागिरकांच्या शंकांचे निरसनही केले. या शिबिरासाठी नवीन पनवेल येथील डॉ. मैथिली लाड आणि त्यांची टीम, डोळे तपासणीसाठी डॉ. निकेत गांधी आणि त्यांचे सहकारी, दंतचिकित्सेसाठी डॉ. अंकिता लोखंडे आणि त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच डॉ. सुषमा ससाणे, डॉ. शुभांगी पत्की यांचेही सहकार्य लाभले .

तपासणीनंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आणि कर्मचारी यास क्लब तर्फे कापडी पंचा, डेटॉल साबण, सॅनिटायझर तसेच टूथ ब्रश व टूथपेस्ट, हेअर ऑइल, मॉइश्चरायझर, हँडवॉश या जीवनावश्यक वस्तूंबरोबरच मल्टी विटामिन टेबलेट्स, कॅल्शियम, सप्लीमेंट प्रोटीन पावडर इत्यादी औषध ही देण्यात आली. या महत्वपूर्ण उपक्रमाबद्दल

शांतीवन संस्थेचे व्यवस्थापक विनायक शिंदे यांनी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलचे आभार मानले.क्लबच्या माजी अध्यक्ष मीनल टिपणीस, सुलभा निंबाळकर आणि अनुराधा लोखंडे यांच्या सहभागामुळे हे शिबिर यशस्वी झाले.
