पनवेल, दि.12 (वार्ताहर)4kNews ः यावर्षी दिनांक 13 व 14 डिसेंबर रोजी दत्तजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. पनवेल तालुक्यातील खिडुकपाडा गावातील दत्तजयंतीचा उत्सव पनवेलसह संपूर्ण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कै. अर्जुन भोईर व कै. सुलोचना भोईर यांच्या प्रेरणेने शेकापचे महाराष्ट्र प्रदेश वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर यांच्या माध्यमातून खिडुकपाडा येथे सालाबादप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त किर्तन, हरिपाठ भजन, होम हवन, महाप्रसाद, श्रींचा अभिषेक अशा धार्मिक सोहळ्यांसह जत्रेचा माहोल व भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी भाविकांना अनुभवण्यास मिळणार आहे. यंदाचे हे उत्सवाचे 21वे वर्ष आहे.

शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी दत्त मंदिरात सायंकाळी 7 ते 9 वाजता ह.भ.प. आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री (सद्गुरु बामनवावा गोशाळा श्री मलंगगड) यांचा कीर्तन सोहळा पार पडणार आहे. यावेळी ह.भ.प. राजेश महाराज बोडविते (हरिग्राम) यांची पखवाज साथ, सद्गुरु वामनबाबा गोशाळा येथील विद्यार्थ्यांची गायनसाथ तर ह.भ.प. मधुकर महाराज गोंधळी यांच्या विणेची साथ लाभणार आहे.

शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 8 वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी 8 ते 9 वाजता होम हवन, सकाळी 9 ते 10 वाजता श्री सत्यनारायणाची महापुजा, दुपारी 12 वाजता महाप्रसाद, दुपारी 1 ते 2 वाजता गायिका रंजना उलवेकर यांच्यासह कुमारीका भजन मंडळाचे भजन, दुपारी 2 ते 4 वाजता बुवा किसन भगत यांचे हनुमान भजन मंडळाचे भजन, सायंकाळी 4 ते 5 वाजता लक्ष्मीनारायण हरिपाठ मंडळ खिडूकपाडा यांचे हरिपाठ वाचन, सायंकाळी 5 ते 6 वाजता लक्ष्मीनारायण भजन मंडळ, खिडूकपाडा आयोजित भजन तर सायंकाळी 6 वाजता श्रीदत्त जन्म व महाआरती होईल. यावेळी भाविकांच्या मनोरंजनार्थ ’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांची छप्पर फाडके जंगी करमणूक असलेल्या ’आबाकी आयेगी बारात’ या मराठी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

कै.सुलोचनाबाई यांचे पुत्र प्रभूअण्णा भोईर हे गेली 21 वर्षे दत्तजयंतीचा वसा अखंडपणे पुढे चालवत आहेत. खिडुकपाडा येथील दत्तजयंतीची कीर्ती पनवेल तालुक्यापलिकडे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण पासून अलिबाग, पेणपर्यंत पसरली आहे. याचे कारण म्हणजे दत्तजयंतीनिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक व व्यावसायिक स्तरावरील मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. सालाबादप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेवून आम्हास उपकृत करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रभूअण्णा भोईर यांनी केले आहे.
