पनवेल, दि.17 (4kNews) ः आमदार म्हणून संधी मिळाल्या नंतर आज प्रथमच अधिवेशना दरम्यान विधान भवनात नवनिर्वाचित आ.विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न विधानभवनात मांडला आहे.

यावेळी आ.विक्रांत पाटील यांनी प्रश्न मांडताना सांगितले की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची पाण्याची गरज भागविताना महानगरपालिकेला अनेक अडचणी निर्माण होत आहे. सध्याची पाण्याची मागणी प्रतिदिन 259 द.लि.लि. प्रतिदिन 224 द.लि.लि.पुरवठा होत आहे. सध्याची लोकसंख्या पाहता महानगरपालिकेला 35 दश लक्ष पाणी अपुरे पडत आहे. या परिसराचा झपाट्याने होणारा विकास पाहता व वाढणारे नागरिकीकरण लक्षात घेता भविष्यात 850 द.लि.लि. प्रतिदिन पाण्याची आवश्यकता लागणार आहे.

भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडकोच्या प्रस्तावित कोणत्याही धरणामध्ये पनवेल महानगरपालिकेस आरक्षण नाही. पाण्याची गरज भागविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने कुंडलिका नदीवरील डोलवहाळ बंधार्यातून 500 दशलक्ष प्रतिदिन पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग यांच्या कार्यालयामार्फत कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या कार्यालयास दि.21/01/2024 रोजी सादर केला आहे. परंतु पनवेल महापालिकेच्या पाणी आरक्षणाच्या मागणीपूर्वी कोणताही महानगरपालिकेच्या प्रस्ताव पाटबंधारे विभागास सादर केला नाही.

पनवेल महानगरपालिकेच्या आवश्यक पाण्याची मागणी शिफारशीसह जलसंपदा विभागाने वरिष्ठ कार्यालयास सादर केली आहे. परंतु त्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याने पनवेल महानगरपालिकेला भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी शासनाने पनवेल महानगरपालिकेला कुंडलिका नदीवरील डोलवहाळ बंधार्यातून 500 दशलक्ष पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याच्या अनुषंगाने निर्णायत्मक कारवाई करावी, अशी मागणी औचित्याच्या मुद्याद्वारे शासनास विनंती आ.विक्रांत पाटील यांनी केली आहे.
