पनवेल (प्रतिनिधी) शास्त्रीय गायनात स्वरमंडल या झंकार वाद्याला एक परंपरा आणि अनन्य साधारण महत्व आहे. शास्त्रीय संगीतातील गायक या वाद्याचा उपयोग करत असतात. असाच एक स्वरमंडल पनवेलमध्ये दाखल झाला आहे, विशेष म्हणजे हे स्वर मंडल सुवर्ण अर्थात मौल्यवान अशा २४ कॅरेट सोन्याच्या धातूचा आहे, आणखी एक विशेष म्हणजे तो जगातील पहिला सुवर्ण स्वरमंडल ठरला आहे.

भजन सम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांचा वारसा अखंडपणे चालवणारे आणि भारतातील नामवंत आग्रा घराण्याचे शास्त्रीय व गायक पं. उमेश चौधरी यांनी जगातील पहिला सुवर्ण स्वरमंडल प्राप्त करण्याचा बहुमान पटकावला आहे. श्री दत्त जयंतीचा सोहळ्याचा योग साधत त्यांना यशवंत महाराज यांच्या हस्ते आणि अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत प्रदान करण्यात आला.

कोलकता येथील स्वरूप बिस्वास तालुकदार हे स्वर मंडल बनवणारे जागतिक कीर्तीचे कारागिर आहेत. त्यांच्या करागिरीतून साकारलेले हे भारतातीलच नाही तर जगातील पहिले सुवर्ण स्वरमंडल असल्याचे स्वरूप यांनी समाज माध्यमांवर माहिती देताना स्पष्ट केले आहे, आणि अशा प्रकारचा जगातील पहिला वाद्य निर्माण केल्याचा आनंद आणि अभिमानही त्यांनी व्यक्त केला आहे. पंडित उमेश चौधरी यांनी देशात आपल्या गायन शैलीने शास्त्रीय संगितचा प्रचार व प्रसार केला आहे. रायगड जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून त्यांनी जिल्ह्याचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे नाव नेहमीच उज्वल केले आहे. देशभर कार्यक्रम होत असले तरी त्यांनी कधीच रियाज सोडला नाही, आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या गायनाला साथ देण्यासाठी सुवर्ण स्वर मंडलाची भर पडली आहे. हा फक्त पनवेल, रायगड, राज्याचाच नाही तर देशाचा अभिमानास्पद स्वरमंडल ठरला आहे.
