पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः पनवेल परिसरातील कोल्ही कोपर व भागातील पाणी प्रश्नासंदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची बाळासाहेब भवन मुंबई येथे शिवसेना पदाधिकार्यांनी भेट घेऊन पाणी प्रश्न संदर्भात निवेदन दिले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ग्रामीण उरण विधानसभा क्षेत्राचे बाळासाहेब नाईक, महिला रायगड जिल्हाप्रमुख मेघाताई दमडे, शिवसेना वडघर विभागप्रमुख नाथाभाऊ भारवड व शिवसेना उपतालुकाप्रमुख उरण ग्रामीण क्षेत्र चंद्रकांत गुजर त्यांच्यासह इतर शिवसैनिकांनी भेट घेवून येथील पाणी प्रश्नासंदर्भात व्यथा मांडली.

या प्रश्नाची तातडीने दखल ना.गुलाबराव पाटील यांनी घेवून संबंधित अधिकार्यांना त्वरित फोन करून आवश्यक ते मार्गदर्शन करून पाणी प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले.
