पनवेल (हरेश साठे) कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ आंतरशालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वक्तृत्व स्पर्धेत १६ विद्यालयातील १५८९६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील बक्षिसपात्र विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, विविध शाळांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘आज्जीबाई जोरात’ या पहिल्या एआय महाबालनाट्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणासह मनोरंजनाचाही आनंद मिळाला.

वक्तृत्व स्पर्धेतून सार्वजनिक भाषणकला आत्मविश्वास वाढवते, नेतृत्वगुण विकसित करते आणि भविष्यातील संधींना दिशा देते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी मिळाली पाहिजे हाच उद्देश घेऊन कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी हा महत्वाचा उपक्रम आयोजित केला. ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ या स्पर्धेत तब्बल १५८९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला होता. अत्यंत सुनियोजनातून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सर्वांत मोठा व्यासपीठ ठरला. हि स्पर्धा इंट्रा क्लास राउंड, इंटर डिव्हिजन राउंड आणि महाअंतिम फेरी या तीन मुख्य टप्प्यांमध्ये पार पडली. आणि त्यामधून विद्यार्थ्यांना आपली वक्तृत्व कला, आत्मविश्वास, विचारशक्ती आणि प्रभावी संवाद कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली. १५८९६ स्पर्धकांमधून अंतिम ११४ स्पर्धकांसाठी भव्य अंतिम फेरीत निवड झाली आणि यातून अंतिम ४५ विजेत्यांना तसेच शाळा व परीक्षकांना आज झालेल्या भव्य सोहळ्यात गौरविण्यात आले.

या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर, माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे,

माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, भाजपचे जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, स्पर्धा प्रमुख व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, अक्षय सिंग, कोशिश फाऊंडेशनचे सचिव ऍड. चेतन जाधव, खजिनदार अभिजित जाधव, सदस्य सत्यवान नाईक, प्रीतम म्हात्रे, गणेश जगताप, स्पर्धा समन्वयक अयुफ अकुला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. पाल्यामध्ये सभाधीटपणा येण्यासाठी पालकांचे प्रोत्साहन महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. पनवेल परिसराला मोठे भवितव्य आहे आणि युवा पिढी घडविण्यासाठी वक्तृत्व विकास महत्वाचा असतो त्या अनुषंगाने या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला पंख देण्याचे काम होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी बोलताना कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी सांगितले कि, कोशिश फाऊंडेशन स्थापन करताना युवा वर्गाचा व्यक्तिमत्व विकास तसेच समाजोपयोगी कार्य करणे व विविध उपक्रमे राबविण्याचा दृष्टिकोन ठेवण्यात आला. त्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, ध्वनी प्रदूषणाचा विचार करून ‘ये दिवाळी शांतिवाली’, घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचे आयोजन नियमितपणे करण्यात येत आहे. गायकांना व्यासपीठ मिळावे याकरिता पनवेल शहरातील प्रसिद्ध वडाळे तलाव या ठिकाणी सूर पनवेलचा कार्यक्रमांतर्गत मैफिल भरवली गेली असून विद्यार्थी वर्गाला शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांचा विकास करता आला पाहिजे, त्यासाठी यापुढेही अशी विविध उपक्रम आणि प्रकल्प राबविले जातील असेही परेश ठाकूर यांनी नमूद केले.

विद्यार्थी अभिव्यक्त झाला तर त्याच्या आयुष्याला दिशा मिळते. त्यामुळे शेवटच्या बाकावरील विद्यार्थी बोलता झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला चालना मिळाली पाहिजे, यासाठी कोशिश फाऊंडेशनचा हा उपक्रम महत्वाचा आहे, असे प्रतिपादन शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण यांनी यावेळी केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक मयुरेश नेतकर तर सूत्रसंचालन वैभव बुवा यांनी केले.

‘आज्जीबाई जोरात’च्या प्रयोगातून शिक्षणासह मनोरंजनाची पर्वणी;
‘आज्जीबाई जोरात’ हे मराठी रंगभूमीवरील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून साकारलेले महाबालनाट्य आहे. लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाची संकल्पना साकारली. नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले आणि जयवंत वाडकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

नाटकात एक आज्जीबाई आपल्या नातवाला मोबाइल गेम्स आणि इंग्रजी माध्यमांच्या प्रभावापासून मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून विविध नाना क्लृप्त्या करते. नाटकात अॅनिमेशन, नृत्य, गाणी आणि जादूचा समावेश करून मुलांना मराठी संस्कृतीची ओळख करून दिली आहे. विशेषत्वाने नव्या तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या नाटकाने विद्यार्थी आणि पालकांवर प्रकाश टाकणारे आहे त्यामुळे हे नाटक नाटक प्रेक्षकांना आकर्षित करणारे आहे, त्या अनुषंगाने या नाटकाच्या आयोजनाबद्दल विद्यार्थी आणि विशेषतः पालकांनी कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांचे आभार मानले.
