पनवेल (प्रतिनिधी) महावाचन उत्सव उपक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकुर पब्लिक स्कूलमधील इयत्ता चौथीतील गार्गी महाडीक हिने उत्कृष्ट वाचन कौशल्याचे प्रदर्शन करत प्राथमिक गटातून रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव २०२४’ हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम तीन गटात राबविण्यात आला. महावाचन उत्सव उपक्रम अंतर्गत आयोजित केलेल्या गट अ इयत्ता तिसरी ते पाचवी गटातील स्पर्धेत गार्गी महाडीक हिने रायगड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत प्रथम आलेल्या गार्गी महाडीक हिला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

अधिकारी यांच्या वतीने गौरविण्यात आले. या अभूतपूर्व यशाने गार्गीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. तिच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी आणि शिक्षकवृंद यांनी गार्गीच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
