पनवेल दि. ०८ (वार्ताहर) : शहरातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याबरोबरच बेकायदेशीर कृत्य आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विविध भागात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवून बेकायदेशीर कृत्य करणारे, अवैध धंदे करणारे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे तसेच अंमली पदार्थ आणि मठाचे सेवन, विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याबरोबरच शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग अपिशन राबविण्यात आले. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ७ हिस्ट्रीशिटरच्या तपासणीत दोघे मिळून आले, २ जेलमध्ये असल्याचे आढळून आले. मात्र, तिघेजण मिळून आले नाहीत.

तसेच १ पाहिजे असलेला आरोपी
मिळून आला नाही. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान परराज्यातील १३२ मजुरांची आणि त्यांच्या
आधारकार्डची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मजूर बांग्लादेशी नागरिक असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दारुबंदी कायद्यान्वये दाखल २ गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे ४ कारवाया करण्यात आल्या. १२ आफ्रिकन नागरिकांची तपासणी करण्यात आली.

त्याचप्रमाणे २ लॉज आणि ३ परदेशी नागरिक गेस्ट हाऊसची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी कारवाईत ४४ चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली, त्यातील ८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच ३३ दुचाकींची तपासणी करून त्यातील ६ वर कारवाई करण्यात आली. यादरम्यान सेक्टर-१९, १९ ए परिसरात प्रभावीपणे पायी गस्त करण्यात आली. पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांच्यासह ७अधिकारी आणि २९ अंमलदार सहभागी झाले होते.
