पनवेल, दि.22 (संजय कदम) ः कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी आज पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून आवश्यक त्या उपाययोजनांसदर्भात मागणी केली.

वाढत्या कोरोना संकटाबाबत चर्चा आणि उपाययोजनांबाबत शिवसेना पक्षाच्या वतीने पदाधिकार्यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी चर्चा करताना पूर्ण जगभरात,भारतात, तसेच महाराष्ट्रातील ठिकठिकाणी कोरोना संक्रमण पुन्हा डोकं वर काडीत असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने महानगर संघटक मंगेश रानवडे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे व महानगरपालिका च्या पदाधिकार्यांबरोबर याबाबत सखोल चर्चा केली.

शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळामध्ये उपस्थित असलेले महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, खारघर शहर संघटक इम्तियाज शेख, विभाग संघटिका सौ ज्योती नाडकर्णी, पनवेल उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, पनवेल उपसघटक सिद्धेश खानविलकर, पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान, उपविभाग प्रमुख गुलाब बागवान यांनी आयुक्तांना कोरोना संकटाला आळा घालण्यास विविध उपाय योजनांची मागणी केली.

त्यामध्ये लसीकरण क्वारंटाईन वार्ड उभा करणे, कोरोना टेस्टिंग ची यंत्रणा उभी करणे अशा विविध मागण्या नमूद केलेले निवेदन पनवेल महानगरपालिकेला सादर केले. आयुक्त मंगेश चितळे यांनी याबाबत शिष्टमंडळात माहिती देताना नमूद केले की सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आपला दवाखाना मध्ये, कोरोना संबंधित अतिदक्षता व लक्षण असल्यास त्वरित ट्रीटमेंट संबंधी आदेश जारी केलेले आहेत व त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा याबाबतची सतर्कता सर्व डॉक्टरांना देण्यात येणार आहे.
