पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः कर्नाटकातून तळोजा परिसरात माल खाली करण्याकरितां आलेल्या टँकरमधून डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

विजयकुमार अजोरपाल हे ठाणे जिल्ह्यात राहत आहेत. हे कळंबोली येथील टैंकर क्रमांक एमएच 43 सी.ई 1688 या गाडीवर टैंकर चालक आहेत. विजयकुमार यांनी बी. पी. कोगनोली, नॅशनल हायवे आप्पाचीवाडी क्रॉस कोगनोली या पंपावर 218 लीटर डिझेल भरले होते.

मँगलोर कर्नाटक राज्यातून तळोजा एम.आय.डी.सी. येथे माल खाली करण्यासाठी आले होते. यावेळी तळोजा एम.आय.डी.सी. येथी एशियन पेंट कंपनीच्या जवळ रात्र झाल्यामुळे ते गाडीतच झोपले. सकाळी उठल्यानंतर डिझेलचा वास येऊ लागल्यामुळे पाहणी केली असता डिझेलची चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबतची माहिती त्यांनी तळोजा पोलीस ठाण्यात दिली आहे.
