पनवेल दि. १८ (वार्ताहर): पनवेल शहरातील मुख्य उड्डाणपूल डीएड कॉलेजकडे उतरताना दुचाकी चालकांसाठी धोकादायक झाला आहे. विजय सेल्स ते डीएड कॉलेज यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या एक्झिटवर कनेक्टरमध्ये गॅप निर्माण झाली आहे, ज्यामुळे डीएड कॉलेजजवळ उतरणाऱ्या एक्झिटजवळ बाईकचे टायर या गॅपमध्ये अडकून वारंवार अपघात होत आहेत.

या उड्डाणपुलावर सकाळपासून तीन दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहती मिळताच शिवसेनेचे युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते आणि शहर अधिकारी निखिल भगत यांनी अपघाताच्या ठिकाणाची पाहणी करून तातडीने पुढील कारवाई केल्याने अपघात सत्र थांबले आहे .

या संदर्भात त्यांनी पनवेल वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना माहिती दिली. तसेच अपघाताचा व्हिडीओ चित्रीत करून तत्काळ वाहतूक अंमलदार रवाना करण्यास सांगितले. ही घटना रेकॉर्ड करत असतानाच त्याच ठिकाणी एक दुचाकीस्वार कोसळल्याचे निदर्शनास आले.गेली २ वर्षे हा उड्डाणपूल एमएसआरडीसीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. याबाबतएमएसआरडीसीच्या अधिकारी शैलजा पाटील यांच्याशी युवासेना अधिकाऱ्यांनी फोनवरून चर्चा करून येथील गॅप तत्काळ भरून घेण्याची मागणी केली. त्यानुसार एमएसआरडीसीने तात्पुरती उपाययोजना केली आहे. मात्र, एमएसआरडीकडून याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास युवासेना एमएसआरडीसीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोट – एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चनुसार, ब्रिजवरील खड्डे बुजवून तेथील प्रत्येक बाजूला एक्झिटआधी स्पीडब्रेकर टाकण्याचे ठरले आहे, जेणेकरून मुख्य रस्त्यावरून येणारी वेगवान वाहने स्लो होऊन अपघाताचा संभाव्य धोका कमी होईल. मूळ अपघाताचे कारण असलेल्या गॅपमध्ये केमिकल टाकून ती भरण्यात येईल. तसेच लोखंडी पट्टीवर अँटी स्लिप पेंट मारण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहने घसरणार नाहीत. या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जात आहोत. यात कुठलीही हयगय अथवा दिरंगाई युवासेना सहन करून घेणार नाही. – पराग मोहिते, युवासेना जिल्हा अध्यक्ष
