पनवेल, दि.25 (4kNews) ः परराज्यातून आलेल्या व पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, खारघर, कळंबोली आदी विभागात बेकायदेशीररित्या नारळ पाणी तसेच फळ विक्री करणार्या परप्रांतीयांवर पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विभाग का कारवाई करत नाही, असा सवाल येथील स्थानिक रहिवाशी करीत आहेत.

शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात, तालुका पोलीस स्टेशन समोर, तहसील कार्यालयाजवळ शहरातील विविध रुग्णालये, नारायण स्वामी मंदिराजवळ, प्राचीन हॉस्पिटल परिसरात, वडाळे तलाव परिसरात, नवीन कोर्टासमोर मोठ्या प्रमाणात परपराज्यातून आलेले नारळ पाणी विक्रेते आपले बस्तान मांडून बसले आहेत. गेल्या काही दिवसापासून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण तोड मोहिम जोरदारपणे सुरू असल्याने त्याचे स्वागत पनवेलकरांनी केले आहे.

परंतु ही अतिक्रमण मोहिम राबविताना संबंधित अधिकारी वर्ग हे दुजाभाव करताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी स्थानिक लोकांच्या व्यवसायावर कारवाई करण्यास येत आहे. परंतु परराज्यातून तर काही जण आसाम, पश्चिम बंगाल या विभागातून आलेले व्यावसायिक आपला धंदा बिनधास्तपणे व सर्वांच्या डोळ्यादेखत करीत असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल पनवेलवासिय करीत असून पनवेल महापालिकेने अशा प्रकारे दुजाभाव न करता सर्वांना समान राखत या परप्रांतीय व्यावसायिकांवर सुद्धा कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
