4k समाचार दि. 26
पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वाजता पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या वेळी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या दिवाळी अंकांना पारिताषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

सोहळ्याला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. दिवाळी अंकांच्या परंपरेला प्रोत्साहित करणार्या या स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची पारितोषिके देऊन त्यांच्या सर्जनशीलतेचा सन्मान केला जातो. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे, असे मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे यांनी कळविले आहे.
