4k समाचार दि. 25
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभाग आणि कला संघटन यांच्या संयुक्त उपक्रमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने संजय देशमुख, आयकर आयुक्त (आंतरराष्ट्रीय कराधान) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

‘ स्पर्धा परीक्षा ही सुवर्णसंधी आहेच मात्र त्याचबरोबर ती समाजाची सेवा आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवायचे असेल, तर त्यांनी या परीक्षेतील यशाचे तंत्र समजून घ्यावे, समाजासाठी समरसून काम करावे, वेळेचे व्यवस्थापन करून अभ्यास करावा, तसेच केवळ एकाच पर्यायाच्या मागे न धावता आपला प्लॅन बी अर्थात पर्यायी मार्ग तयार ठेवावा, अशा शब्दांत मा. श्री. संजयजी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला. आपल्या प्रशासकीय सेवेच्या अनुभवातून अनेक आंतरराष्ट्रीय संदर्भ देत संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला त्याचबरोबर त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.शासकीय नोकऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात,

या उद्देशाने महाविद्यालयात अद्ययावत ग्रंथालय तसेच सी. डी. देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ करून घ्यावा, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. एस. के. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख आणि कला संघटनेचे अध्यक्ष प्रा. एम. एम. अंबुलगेकर यांनी करून दिला.मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर हिंदी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. भूषण घरत यांनी ईशस्तवन आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सीडी देशमुख स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख संजय हिरेमठ यांचे विशेष सहकार्य लाभले.
