पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः ’सिडको’ने संपादित केलेल्या जमिनीवर आणि भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक तसेच पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रीज टाकणार्या डंपर चालकांची ’सिडको’ कडून धरपकड सुरुच आहे. उलवे परिसरातील ’सिडको’ च्या मोकळ्या भूखंडावर डेब्रीज टाकण्यासाठी आलेले 4 डंपर ’सिडको’ च्या पथकाने उलवे येथील अटल सेतू जवळ पकडले. त्यानंतर सदर 4 डंपर चालकाविरोधात उलवे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन सर्व डंपर जप्त केले आहेत.

’सिडको’च्या भूखंडावर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात डेब्रीज टाकण्यात येत असून सदरचे डेब्रीज मानवी आरोग्यास धोकादायक आणि पर्यावरणास हानीकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ’सिडको’च्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणार्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली ’सिडको’चे दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग आणि पोलीस पथकाकडून जोरदार कारवाई सुरु करण्यात आली आहे.

मुंबई येथून अटल सेतू मार्गे मानवी आरोग्यास हानिकारक असलेले डेब्रीज टाकण्यासाठी 4 डंपर उलवे भागात आले होते. याबाबतची माहिती सिडकोच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने उलवे येथील अटल सेतू जवळ धाव घेऊन डेब्रीजने भरलेले 4 डंपर ताब्यात घेतले. या कारवाईत पकडण्यात आलेल्या सुभाषचंद्र यादव (26), सुरजकुमार पाल (27), आझाद सिंग (28) आणि 35 वयोगटातील चालक या चारही डंपर चालकाविरोधात उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
