4k समाचार
पनवेल दि. २१ ( संजय कदम ) : रबाळेपोलिसांनी सोनसाखळी खेचणाऱ्या एका सराईत चोरट्याला कोपरखैरणे परिसरातून अटक केली आहे. रोहित शिवाजी गायकवाड (२४) असे त्याचे नाव असून, त्याने घणसोली परिसरात केलेल्या सोनसाखळी चोरीच्या दोन गुन्ह्यांना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांतील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याचे सांगितले आहे.

घणसोलीत राहणारी श्यामलता सिंग (३८) ही विवाहिता घणसोली सेक्टर-९ येथील खाडी ब्रिजवरून जात असताना रोहितने तिच्या छातीत जोरात बुक्का मारून गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वपोनि. बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अविनाश पाळदे, पोलीस हवालदार प्रसाद वायंगणकर, पोलीस नाईक विजय करंकाळ, प्रल्हाद जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले व गुप्त माहिती दारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.

दरम्यान, तो कोपरखैरणे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रोहित याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने घणसोलीत दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावर पोलिसांनी त्याच्याकडून श्यामलता सिंघ यांची ७० हजारांची सोन्याची चेन व या आधीच्या गुन्ह्यात खेचलेले १ लाख ७० हजार रुपयांचे मिनी मंगळसूत्र असे एकूण २.४० लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केल्याची माहिती वपोनि. बाळकृष्ण सावंत यांनी दिली.
