4k समाचार पनवेल प्रतिनिधी. संजय कदम
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने सोमवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी पनवेलच्या पीर करम अली शहा उर्दू प्राथमिक शाळेतील मुलींना “गुड टच – बॅड टच” या अत्यंत संवेदनशील विषयावरती समुपदेशन करण्यात आले. माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे आणि सायकॉलॉजिस्ट अनिशा कोल्हापुरे या दोन निष्णात वक्त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष मंदार दोंदे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल ७० हजार विद्यार्थिनींना “गुड टच – बॅड टच” तसेच मुलींच्या लैंगिक समस्या, करियर कौन्सिलिंग या विषयावर समुपदेशन करण्यात आले आहे. सायकॉलॉजिस्ट अनिशा कोल्हापुरे यादेखील अत्यंत सोप्या शब्दांमध्ये हा क्लिष्ट विषय उलगडून दाखवतात. सदर समुपदेशन कार्यक्रम पहिली ते आठवीच्या मुलींकरता आयोजित करण्यात आला होता. तब्बल १४२ विद्यार्थिनींनी यावेळी तज्ञांसोबत संवाद साधला. सुरुवातीला थोड्याशा बुजलेल्या मुलींनी नंतर उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सल्लागार माधव पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मंदार दोंदे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच एका अत्यंत गरज असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.मुख्याध्यापिका नाझीया सायरा युसुफ दळवी यांनी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचातील उपस्थित सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी तिसरीच्या विद्यार्थिनींनी अप्रतिम हस्तकलेतून निर्माण केलेल्या कागदी फुलांचे पुष्पगुच्छ सन्माननीय सदस्यांना प्रदान करण्यात आले. मुलींसाठी अत्यंत गरजेच्या असणाऱ्या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी पत्रकार मंचाचे आणि माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांचे मनापासून आभार मानले.

पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने यावेळी उपस्थित सर्व मुलींना हायजिन किट देण्यात आले. “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर” हा संदेश यावेळी लहानग्या विद्यार्थिनींना देण्यात आला. स्वच्छता राखल्याने आजारी पडण्याचे प्रमाण ५० टक्क्यांहून कमी होते. दैनंदिन जीवनात स्वच्छता राखण्याकरता आवश्यक असणाऱ्या गोष्टी यावेळी मुलींना प्रदान करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, मंचाचे सल्लागार माधव पाटील, अध्यक्ष मंदार दोंदे, सल्लागार विवेक मोरेश्वर पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, दीपक घोसाळकर,प्रवीण मोहोकर,राजू गाडे, जॉन्सन जॉर्ज,मुख्याध्यापिका नाझीया सायरा युसुफ दळवी,समन्वयक काझी सर, पीर करम अली शहा उर्दू माध्यम प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंद यांची प्रमुख उपस्थिती होती.
