4k समाचार
पनवेल, दि. १६ सप्टेंबर – पनवेल महापालिका क्षेत्रात रस्त्यांचे डांबरीकरण मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब डांबरीकरणामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून वाहनधारक आणि रहिवाशांकडून पालिकेकडे तक्रारींचा अक्षरशः पूर आला आहे.

या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी ठेकेदारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत सज्जड दम दिला आहे. खराब झालेले रस्ते ठेकेदारांनी स्वतःच्या खर्चाने तात्काळ दुरुस्त करून पुन्हा तयार करावेत, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. याबाबत महापालिकेकडून ठेकेदारांना लेखी आदेशही देण्यात आले असून, त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

आयुक्तांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले असून पालिकेच्या कामकाजावर लक्ष ठेवून कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे रस्ते दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे.
